Gold Demand : देशात दिवाळी आणि लग्नसराईच्या काळात सोन्याची मागणी जोरदार वाढते, पण यंदा उच्चांकी किमतीमुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडला आहे. यामुळे, जुलै ते सप्टेंबर २०२५ या तिमाहीत देशातील सोन्याची मागणी तब्बल १६% ने घसरली आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. WGC च्या अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर २०२५ या तिमाहीत देशात सोन्याची एकूण मागणी २०९.४ टन इतकी नोंदवली गेली, जी मागील वर्षीच्या समान तिमाहीच्या तुलनेत खूपच कमी आहे.
मूल्यांकन वाढले, पण व्हॉल्यूम घटले
सोन्याचे दर वाढल्यामुळे, जरी मूल्यानुसार सोन्याची मागणी २३% ने वाढली, तरी व्हॉल्यूमनुसार १६% ची मोठी घट स्पष्टपणे दिसून आली. यातही सोन्याच्या दागिन्यांची मागणी ३१% ने घसरली. तर दुसरीकडे गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी मात्र २०% ने वाढून ९१.६ टन वर पोहोचली.
सोन्याकडे 'गुंतवणूक' म्हणून पाहण्याचा कल वाढला
WGC इंडियाचे रिजनल सीईओ सचिन जैन यांनी सांगितले की, "भारतीय ग्राहक आता सोन्याकडे केवळ दागिना म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून पाहत आहेत." गुंतवणूकदारांनी सोन्याची नाणी आणि बार्स मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे गुंतवणुकीचे एकूण मूल्य ८८,९७० कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. वार्षिक आधारावर हे मूल्य ७४% ची मोठी झेप दर्शवते.
ज्वेलरीच्या मागणीवर परिणाम
सोने महाग झाल्यामुळे ग्राहक आता हलके वजन आणि कमी कॅरेटच्या दागिन्यांकडे वळत आहेत. सप्टेंबर महिन्यात आलेल्या 'श्राद्ध पक्षा'मुळेही दागिन्यांच्या विक्रीवर नकारात्मक परिणाम झाला.
आयात आणि रिसायकलिंगची स्थिती
भारताची सोन्याची आयात ३७% ने घटून १९४.६ टन झाली आहे. जुन्या सोन्याच्या विक्रीतही ७% ची घट नोंदवली गेली, ज्यामुळे ग्राहकांना आपले जुने सोने विकण्याऐवजी जपून ठेवणे अधिक पसंत असल्याचे दिसून येते. तरीही, प्रमुख ज्वेलर्सच्या एकूण विक्रीपैकी ४०% विक्री जुन्या सोन्याच्या एक्सचेंजमधून होत आहे.
पुढील अपेक्षा
आता सण आणि लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्यामुळे बाजारातील अपेक्षा पुन्हा वाढल्या आहेत. WGC चा अंदाज आहे की, २०२५ मध्ये भारताची एकूण सोन्याची मागणी ६०० ते ७०० टनांच्या दरम्यान राहील.
